जिल्हा प्रतिनिधी,निलेश रामगावकर
अमरावती : शहरात वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह सफाई कामगारांचेही हाल होत आहेत. तापमान ४५ अंश सेल्सियसच्या पुढे गेले असताना अमरावती महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात मा. आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले असून सफाई कामगारांसाठी तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक प्रभागांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसताना कमी कामगारांकडून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून घेतली जात आहे. त्यामुळे कामगारांवर अतिरिक्त ताण येत असून त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कामगारांना सावली, शुद्ध पिण्याचे पाणी, विश्रांती केंद्र, सुरक्षात्मक साहित्य तसेच उष्माघात प्रतिबंधक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. शहराचे आरोग्य जपणाऱ्या या कामगारांचे स्वतःचे आरोग्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
तसेच इतर महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनांनी कामगारांसाठी विविध सुविधा सुरू केल्याचे उदाहरण देत अमरावती महानगरपालिकेनेही तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या विषयावर तातडीने कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात तसेच प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


