विदर्भ-मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाचे सुरू असलेले काम तात्काळ बंद करण्यात यावे अशी तक्रार राष्ट्रीय जनजाती आयोगात आदिवासी कार्यकर्ते श्रीनिवास अशोक उईके (रा. झापरवाडी ता. आर्णी) यांनी दाखल केली होती. यावर दिल्ली येथील राष्ट्रीय जनजाती आयोगात आयोगाचे अध्यक्ष
अंतर सिंग आर्य यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. या प्रकल्पामुळे पेसा कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत असून आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची बाब धरण विरोधी संघर्ष समितीने आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
यात 44 गावे ही पेसा आदिवासी झोनमधली गावे असून यामुळे या भागातील नागरीक जल, जंगल, जमीन पासून दुरावला जाईल व त्यांची संस्कृती व परंपरा नष्ट होईल. प्रकल्पामुळे आदिवासी व प्रकल्पग्रस्तांचे उपजिवकीचे साधन नाहीसे होते. या प्रकल्पाचा डीपीआर तयार नाही, प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही, पेसा ग्रामसभेचे विरोधात ठराव असताना, नियमांना डावलून भूसुरुंग स्फोट घडविले जात आहे, पर्यावरण विभागाची मंजुरी नाही, 2006 च्या वनहक्क कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याची अतिशय गंभीर बाब आयोगाने नमूद केली. धरण विरोधी संघर्ष समितीने हे काम तात्काळ बंद करावे अशी आयोगासमोर जोरकसपणे मागणी केली. त्यावर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला की आम्ही आदिवासींच्या जमिनीवर प्रकल्पाचे काम करत नसून जिथे काम सुरू आहे ती जागा 2011 सालीच लोकांनी शासनाला दिली त्यामुळे खडका व खंबाळा येथे सुरू असलेले काम हे तेथील जमीन शासनाच्या अधीन असल्यामुळे तिथे काम सुरू असल्याचे नमूद केले. ही जमीन पाटबंधारे विभागाच्या हक्काची असल्याने यात आयोगाच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप करणे उचित होणार नाही असे नमूद केले.
दोन्ही बाजूंनी युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रकल्पाचे काम हे पेसा कायद्याचे उल्लंघन व नियमांना डावलून करता येणार नाही असे आयोगाने स्पष्टपणे सांगितले. सुनावणीला शासनाच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माहूरचे पोलिस उपअधीक्षक भोंडवे, पांढरकवड्याचे पोलीस उपअधीक्षक बन्सल, अमरावतीचे मुख्य अभियंता टाले, यवतमाळचे अधिक्षक अभियंता प्रकाश पाटील, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सूरज राठोड, पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता जुनेजा, प्रकल्पाचे उपअभियंता अनिकेत गुल्हाने व इतर अधिकारी उपस्थित होते. धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने याचिकाकर्ते श्रीनिवास उईके, समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप पाटील, ॲड. बालाजी येरावार, प्रल्हाद गावंडे, संदीप (बंटी) जोमदे हे उपस्थित होते.
गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


