पारवा जि.प. कन्या शाळेला आधुनिक स्पीकर बॉक्स भेट
विद्यार्थिनींच्या डिजिटल शिक्षणाला मिळणार नवी चालना
घाटंजी : विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत पारवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेला आधुनिक स्पीकर बॉक्स भेट देण्यात आला.
शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी अनुश्री बल्लूरवार हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते प्रविण जयस्वाल यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला. या स्पीकर बॉक्समुळे शाळेतील परिपाठ, डिजिटल शिक्षण, बालगीते, गोष्टी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.
यावेळी देणगीदार प्रविण जयस्वाल, पारवा पोलीस स्टेशनचे ए.एस.आय. लखन राठोड, पालक राजू बल्लूरवार, घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे, एकता पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी, संस्थेचे सचिव राजू चव्हाण, मुख्याध्यापिका गीता मानकर, शिक्षण सेवक निकिता राठोड, शिक्षणप्रेमी गिरीश सुकंडवार यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी प्रविण जयस्वाल यांचे आभार मानले. अशा सामाजिक योगदानामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळून शालेय उपक्रमांना नवी ऊर्जा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

