टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
तालुका प्रतिनिधी : राजेश सोयाम, पांढरकवडा
पांढरकवडा : कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर तालुक्यातील नागेझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘१२ अभंग’ कार्यक्रमाची भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर भगव्या टोप्या आणि खांद्यावर भगवे उपरणे परिधान करून ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष केला.
महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मिरवणुकीचे स्वागत केले. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या धार्मिक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि आध्यात्मिक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


