भटके-विमुक्तांच्या हक्कांसाठी प्रशासनाचे एकाच छताखाली प्रयत्न...!






प्रमाणपत्रांसह विविध योजनांचा थेट लाभ ; १३ विविध विभागांचे ११३ स्टॉल, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


मूर्तिजापूर : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना तसेच आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी मंगळवारी (२९) तहसील कार्यालय परिसरातील शासकीय गोदाम क्रमांक ६ येथे ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’राबविण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला भटके-विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

      या अभियानात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी ७ शिधापत्रिका, २ जात प्रमाणपत्रे, ३ आयुष्मान भारत कार्ड, २३ महिला शेतकरी प्रमाणपत्रे तसेच ४ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभ प्रत्यक्ष वितरित करण्यात आले.

अभियानाच्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी विविध विभागांचे तब्बल ११३ स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत पुरवठा, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, आधार, दुय्यम निबंधक तसेच तक्रार निवारण कक्ष आदी सेवांचे स्टॉल यामध्ये सहभागी होते. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या न मारता नागरिकांना प्रमाणपत्रे, योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि महसुली मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाले.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे आणि अपर तहसीलदार गिरिजादेवी लोखंडे यांच्या पुढाकारातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार होते. तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हास्तरीय विमुक्त जाती विषयक अशासकीय सदस्य कैलास देवराव कदम, सामाजिक कार्यकर्त्या रजनी पवार, गटविकास अधिकारी मिलींद मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, निवासी नायब तहसीलदार रवींद्र राऊत, महसूल नायब तहसीलदार दिनेश सोनोने, निवडणूक नायब तहसीलदार महेश नागोलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय सेवांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने अभियान नागरिकांसाठी उपयुक्त ठरले. विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post