महसूल अडचणींसाठी " समाधान शिबिरे " ; शेतकरी-नागरिकांनी घ्यावा लाभ

 

Mzr



छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाअंतर्गत तालुक्यात शिबिरांची मालिका


१४ मार्चला पुंडलिक नगर येथे आमदार हरीष पिंपळे यांच्या उपस्थितीत जनसंवाद


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 


मुर्तिजापूर - शेतकरी व नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित अडचणींचे जलद आणि पारदर्शक पद्धतीने निवारण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत तालुक्यात विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले.

         उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. ५) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या अभियानाचा पहिला टप्पा तालुक्यात राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

या अभियानांतर्गत महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, प्रलंबित प्रकरणे व नोंदींची कामे तात्काळ निकाली काढण्यासाठी विविध गावांमध्ये विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. शिबिरांमध्ये ७/१२ उतारा, फेरफार व प्रलंबित नोंदींचे निवारण, ई-पीक पाहणी संदर्भातील प्रकरणे, जमीन नोंदी दुरुस्ती, वारस नोंद व विभाजन प्रकरणे, महसूल अभिलेख तपासणी तसेच तक्रार निवारण यांसारख्या विषयांवर थेट कार्यवाही करण्यात येणार आहे.तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनही नागरिकांना दिले जाणार आहे.

दि. १४ मार्च रोजी श्री पुंडलिक महाराज संस्थान, पुंडलिक नगर येथे होणाऱ्या शिबिरात आमदार हरीष पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शेतकरी व नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित कामांवर तत्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही अपार यांनी दिली.

  या पत्रकार परिषदेला तहसीलदार शिल्पा बोबडे व नायब तहसीलदार रविंद्र राऊत उपस्थित होते. संबंधित गावांतील शेतकरी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरांना उपस्थित राहून महसूल विषयक अडचणींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

--------------------------------------

• शिबिरांमध्ये मिळणार या सेवा

७/१२ उतारा व फेरफार नोंदींचे निवारण,ई-पीक पाहणी संदर्भातील प्रकरणे,जमीन नोंदी दुरुस्ती,वारस नोंद व विभाजन प्रकरणे,महसूल अभिलेख तपासणी,तक्रार निवारण,विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन _______________________

• अशी आहे शिबिरांची मालिका •

७ मार्च २०२६ – जिल्हा परिषद शाळा, जामठी बु.,१४ मार्च २०२६ – श्री पुंडलिक महाराज संस्थान, पुंडलिक नगर,१० एप्रिल २०२६ – श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी,१७ एप्रिल २०२६ – श्री जागेश्वर संस्थान, कंझरा

८ मे २०२६ – जि.प. हायस्कूल, नवीन गोडाऊन (लाल शाळा), हातगाव,१५ मे २०२६ – विद्याभारती हायस्कूल, शेलूबाजार,२२ मे २०२६ – जि.प. हायस्कूल, माना

२९ मे २०२६ – ग्रामपंचायत कार्यालय, कुरुम

----------------------------------------





Tags :  #महसूल, #शेतकरी, #समाधानशिबिरे, #शेतकऱ्यांचीसमस्या, #नागरिकसहयोग, #कृषीविकास, #कृषीसरकार, #महसूलअडचणी, #शेतकरीसमर्थन, #शेतकरीकथा, #समस्याआणिसमाधान, #कृषीन्या, #खेती, #पिकांचेनिर्धारण, #उद्योग

Post a Comment

Previous Post Next Post