महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रींना अभिवादन ; दुष्काळ निवारणासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मूर्तिजापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यासह वृक्षारोपण करण्यात आले.
मूर्तिजापूर तालुक्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीला विशेष महत्त्व देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याच उद्देशाने रुग्णालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘वृक्षसंवर्धनातून पर्यावरणाचा समतोल आणि भविष्यातील दुष्काळावर उपाय’असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विशेष म्हणजे, यापूर्वी रुग्णालय परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचेही यावेळी पूजन करून त्यांच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. स्वच्छ व हिरवाईने नटलेला रुग्णालय परिसर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांसाठीही सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या उपक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा संदेश देतानाच शास्त्री जयंतीनिमित्त साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले.
